अमळनेर येथे व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु

अमळनेर सत्तार खान




अमळनेर नगरपरिषदेसमोर अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 1975 पासून आजपर्यंतच्या प्रलंबित नियुक्ती प्रकरणांवर तातडीने निर्णय घेऊन पात्र वारसांना नियुक्ती आदेश द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संघटनेने प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, सातत्याने पाठपुरावा करूनही नगरपरिषद प्रशासनाने नियुक्ती प्रक्रियेत टाळाटाळ व दिरंगाईचे धोरण अवलंबले आहे. सेवानिवृत्त व मयत कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके गहाळ झाल्यानंतरही संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच कार्यरत सफाई कामगारांची सेवा पुस्तके अद्ययावत करून त्यांना दुय्यम प्रतही देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला.

याशिवाय सेवानिवृत्त व मयत सफाई कामगारांच्या आर्थिक लाभातून बेकायदेशीर कपात करून आर्थिक घोटाळा झाल्याचाही गंभीर आरोप संघटनेने केला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासकीय गुन्हे दाखल करून पात्र वारसांना नियुक्ती आदेश मिळेपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा संघटनेने दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे करत असून, उमेदवार सौ. किरणबाई अनिल बेडवाल, संदीप अर्जुन धाप, बरखा सुनील संगोले,सिमरन यश लोहरे, नरेंद्र गुरुचरण घोगले यांच्यासह इतर उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत.

यावेळी विविध सफाई कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत जाहीर पाठिंबा दिला. आंदोलनात विकास जाधव, अर्जुन धाप, राजू चंडाले, अनिल बेडवाल, प्रल्हाद चव्हाण, किशोर संगोले, गुरुचरण पवार, राजेश बेडवाल, किशोर गोयर, छनु चव्हाण, रतन जेधे, चंदन घारू, सरजू जावडेकर, प्रकाश घारू, सुरेश बिसणारिया, आनंद भैय्या जावडेकर, धनराज पीवाल, दिगंबर आठवाल, रूपाबाई संगोले, कमलाबाई धाप, रजनीबाई बेडवाल यांच्यासह वंचित समाजातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषद प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेणार की आंदोलन अधिक तीव्र होणार, याकडे आता संपूर्ण अमळनेरचे लक्ष लागले आहे.

Comments