पुणेतील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर-पारोळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाईहातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे

अमलनेर सत्तार खान



पुणे येथे घडलेल्या अलीकडील मद्यप्रकरणाची दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा तालुक्यात अवैध मद्यनिर्मिती व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवित धडक कारवाई केली. अमळनेर तालुक्यातील गांधली, नांदेड तसेच पारोळा तालुक्यातील चिखलोद व शेडावे परिसरातील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रांवर छापे टाकण्यात आले. तसेच ताडीची वाहतूक करतानाही कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. छाप्यात ६०६० लिटर रसायन, १९४ लिटर ताडी, १०० लिटर गावठी दारू तसेच एक मोटारसायकल असा एकूण ३ लाख ७६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेले रसायन वाहतुकीस अयोग्य व मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने ते घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
अवैध मद्यनिर्मिती व विक्री ही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दंडनीय असून अशा गुन्ह्यांमध्ये संबंधित आरोपींवर फौजदारी कारवाईची तरतूद आहे. तसेच अवैध मद्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत.
कारवाईनंतर संबंधित आरोपींना जागेवर सूचनापत्र देण्यात आले. ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव जिल्हा अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी चोपडा विभागाचे निरीक्षक कय्युम मोमीन, पारोळा विभागाचे निरीक्षक आर.के.फुसे, अमळनेर विभागाचे निरीक्षक गोपाल मोरे, जवान डी. एन. पाटील, शशिकांत पाटील व भूषण परदेशी उपस्थित होते. पुढील तपास दुय्यम निरीक्षक गोपाल मोरे करीत आहेत.

कोट १
"पारोळा तालुक्यातील चिखलोद व शेडावे परिसरातील अवैध हातभट्टीवर तयार होणारी दारू अमळनेर शहरातिल पैलाड भागात पुरविली जात असल्याची गुप्त माहिती विभागाला प्राप्त झाली होती. त्याआधारे नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली."

कोट २
"पुणे येथील मद्यप्रकरणानंतर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्याचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व पारोळा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली."

Comments