अमळनेर प्रतिनिधी | सत्तार खान
दि. १० सप्टेंबर २०२६
शेतकऱ्यांच्या जीवनात बैलपोळा हा केवळ सण नसून वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा शिंदखेडा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने या आनंदाच्या सणावरच दुष्काळाचे सावट पसरले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाअभावी हिरावला जाण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये बैलपोळ्याचा उत्साह जवळपास मावळल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
शिंदखेडा तालुक्यात अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपू लागली आहेत. पाण्याअभावी पिकांचा पाला जळत असून शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर संकट आले आहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असताना पिकांचे होत असलेले नुकसान पाहून बळीराजा चिंतेत आहे.
वर्षभर ऊन-पावसाची पर्वा न करता शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीची कामे करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजविले जाते, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना प्रेमाने गोडधोड खाऊ घातले जाते. मात्र यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर करपणारी पिके आणि वाढता पाण्याचा प्रश्न असल्याने बैलपोळ्याचा पारंपरिक उत्साहही फिका पडला आहे.
मागील वर्षी काही लोकप्रतिनिधींनी बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांना बैलांचा साज व श्रृंगाराचे साहित्य देऊन मदतीचा हात पुढे केला होता. यंदाही अशाच प्रकारची मदत मिळाली असती, तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असता, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्याऐवजी काही राजकीय मंडळी स्वतःच्या राजकीय भवितव्याच्या गणितात व्यस्त असल्याची नाराजीही शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. “शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणार कोण?” हा प्रश्न सध्या ग्रामीण भागात उपस्थित केला जात आहे.
‘देवा, बळीराजासाठी तरी पाऊस पाड!’
पाऊस न झाल्याने शेतकरी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली गुरेढोरे यांच्यासमोर चारा-पाण्याचेही संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे यंदाचा बैलपोळा शेतकऱ्यांसाठी आनंदापेक्षा चिंतेचा ठरत आहे.
“देवा, तुझे अस्तित्व कुठे असेल तर माझ्या बळीराजासाठी तरी पाऊस पाड. त्याच्या मुलाबाळांचा संसार, वर्षभर त्याची साथ देणारी गुरेढोरे आणि बैलांचा चारा यासाठी तरी आभाळ भरून येऊ दे,” अशी आर्त हाक शेतकऱ्यांच्या मनातून उमटत आहे.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांच्या अंगावर रंग चढतो; पण यंदा बळीराजाच्या मनावर मात्र चिंतेची काळी छाया आहे. त्यामुळे पाऊस कधी बरसणार आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद कधी फुलणार, याकडे संपूर्ण शिंदखेडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment